एलपीजी बुकिंग व्यवस्थेत नुकत्याच झालेल्या बदलांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. काही काळ विस्कळीत झालेली घरपोच सिलिंडर वितरण सेवा आता पुन्हा सुरळीत सुरू झाली असून विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा दिलासा ठरला आहे. वितरकांनी गावोगावी ही सेवा पूर्ववत केल्यामुळे आता सिलिंडर मिळवण्यासाठी लांब अंतराचा त्रास सहन करावा लागत नाही.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला सुरू झालेल्या युद्धामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सिलिंडर मिळवण्यासाठी वितरकांच्या कार्यालयात वारंवार जावे लागत होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. ग्राहकांना घरबसल्या सहज बुकिंग करता येत असून नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून केलेल्या बुकिंगनंतर लगेच ओटीपी प्राप्त होतो. या ओटीपीच्या आधारेच सिलिंडरची सुरक्षित आणि खात्रीशीर डिलिव्हरी केली जाते. केंद्र सरकारच्या माहितीनुसार सध्या बहुतांश बुकिंग प्रक्रिया ओटीपी प्रणालीवर आधारित आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात कुठेही सिलिंडर तुटवडा नसून पुरवठा व्यवस्था पूर्णपणे सुरळीत झाली आहे. अलीकडेच आणखी एक एलपीजी टँकर यशस्वीरित्या देशात दाखल झाला आहे. गुजरातमधील कांडला बंदरात पोहोचलेल्या या टँकरमुळे पुरवठा अधिक मजबूत होण्यास मदत झाली आहे. काही दिवसांपूर्वी होर्मुझ सामुद्रधुनी पार करून आलेल्या या टँकरमुळे पुरवठा साखळी पुन्हा गतीमान होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे पण वाचा » राज्यात 70 हजार पदांची मेगा भरती; MPSC भरणार 20 हजार पदे – मुख्यमंत्री फडणवीस
भारत आपल्या एकूण एलपीजी गरजेपैकी मोठा हिस्सा आखाती देशांकडून आयात करतो. युद्धामुळे या पुरवठ्यात तात्पुरता अडथळा निर्माण झाला होता आणि काही जहाजे मार्गातच अडकली होती. मात्र आता टप्प्याटप्प्याने ही जहाजे देशात पोहोचत असून परिस्थिती हळूहळू पूर्ववत होत आहे.
दरम्यान, गॅस सिलिंडरच्या दरांमध्येही काही बदल पाहायला मिळाले. एप्रिलच्या सुरुवातीला व्यावसायिक सिलिंडर महाग झाले असले तरी घरगुती सिलिंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले. यापूर्वी मार्चमध्ये घरगुती गॅसच्या दरात वाढ झाली होती, ज्याचा परिणाम लहान सिलिंडरच्या किमतीवरही झाला आहे.
ग्राहकांसाठी आणखी एक दिलासादायक बदल म्हणजे ५ किलोच्या सिलिंडरसाठी आता पत्त्याचा पुरावा आवश्यक नाही. फक्त ओळखपत्राच्या आधारे कोणालाही हा सिलिंडर सहज उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद झाली आहे.
काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली असून बेकायदेशीर साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित कारवाई सुरू आहे. या उपाययोजनांमुळे बाजारातील अनियमितता कमी होऊन ग्राहकांना योग्य दरात आणि वेळेवर गॅस सिलिंडर मिळेल, अशी अपेक्षा आहे.
