युको बँकेत पदवीधरांना 530 जागांसाठी नोकरीची संधी! वाचा सविस्तर..

Job Opportunities in UCO Bank: बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. यूको बँकेने २०२६ मध्ये अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून, या भरतीअंतर्गत देशभरात एकूण ५३० उमेदवारांची निवड केली जाणार आहे. बँकिंग क्षेत्रात कामाचा अनुभव मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार असून, प्रशिक्षण कालावधीत दरमहा १६,६५० रुपये मानधन मिळणार आहे. यामध्ये बँकेकडून १०,५०० रुपये आणि केंद्र सरकारच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे ६,१५० रुपये दिले जातील.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराने १ एप्रिल २०२२ रोजी किंवा त्यानंतर पदवी प्राप्त केलेली असावी. वयोमर्यादेचा विचार करता, १ ऑक्टोबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे, इतर मागासवर्गीय उमेदवारांना तीन वर्षे, तर दिव्यांग उमेदवारांना लागू नियमांनुसार १० ते १५ वर्षांपर्यंत वयोमर्यादेत सवलत मिळू शकते.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संबंधित राज्याची स्थानिक भाषा वाचता, लिहिता, बोलता आणि समजता येणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. मात्र, स्थानिक भाषेची चाचणी देण्यापासून सूट मिळण्यासाठी उमेदवाराने दहावी किंवा बारावीमध्ये संबंधित स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे. याबाबतची अट अधिकृत जाहिरातीनुसार तपासावी.

यूको बँक अप्रेंटिस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १४ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर २०२६ आहे. या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहिरातीत नमूद आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून परीक्षेची तयारी सुरू करावी.

Read Also: थेट मुलाखतीद्वारे नागपूर येथे नोकरीची संधी; ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित!

अर्जासाठी परीक्षा शुल्क प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी शुल्क २०० रुपये अधिक जीएसटी आहे. खुल्या प्रवर्गातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आणि इतर मागासवर्गीय पुरुष उमेदवारांसाठी ८०० रुपये अधिक जीएसटी, तर याच प्रवर्गांतील महिला आणि तृतीयपंथी उमेदवारांसाठी ६०० रुपये अधिक जीएसटी शुल्क आकारले जाणार आहे. अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीतील शुल्कासंबंधीच्या अटी तपासाव्यात.

उमेदवारांची निवड प्रामुख्याने ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाणार आहे. ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून, एकूण १०० गुणांसाठी ६० मिनिटांचा कालावधी दिला जाईल. परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान आणि आर्थिक विषयांची जागरूकता, इंग्रजी भाषा, तर्कशक्ती व संगणकविषयक क्षमता आणि गणितीय अभियोग्यता या चार विभागांचा समावेश असेल. प्रत्येक विभागात २५ प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक विभागासाठी २५ गुण असतील. ऑनलाइन परीक्षेतील कामगिरीच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांची स्थानिक भाषा चाचणी घेतली जाईल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाऊ शकते.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रशिक्षण योजना म्हणजेच एनएटीएसच्या पोर्टलवर नोंदणी करावी. त्यानंतर यूको बँकेच्या अधिकृत भरती पोर्टलवर जाऊन संबंधित भरतीची निवड करावी, अर्जातील आवश्यक माहिती भरावी आणि लागू असलेले परीक्षा शुल्क जमा करावे. अर्ज सादर करण्यापूर्वी वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि इतर आवश्यक माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्यावी.

अधिकृत माहिती, अर्जाची लिंक आणि भरतीसंबंधीच्या अटी जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी यूको बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, स्थानिक भाषेची अट, परीक्षा शुल्क आणि निवड प्रक्रियेचा तपशील काळजीपूर्वक वाचावा.

या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरील भरतीची अधिकृत PDF जाहिरात सविस्तर वाचावी. सर्व माहितीची पडताळणी झाल्यानंतर अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी युको बँकेच्या संकेतस्थळावर भेट द्या.