तुमच्या खात्यात येतील १५,००० रुपये; मोदी सरकारने सुरू केली ‘ही’ खास योजना!

PM Vikasit Bharat Rojgar Yojana: स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशभरातील तरुणांना एक मोठी भेट दिली. त्यांनी देशातील तरुणांसाठी ‘पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना’ या नावाने एक लाख कोटी रुपयांची नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत सुमारे ३.५ कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जातील, असे मोदींनी सांगितले. तसेच, खासगी क्षेत्रात पहिली नोकरी करणाऱ्या तरुण-तरुणींना सरकारकडून ₹१५,००० देण्याचीही घोषणा त्यांनी केली.

या योजनेनुसार, केंद्र सरकार अशा कंपन्या आणि व्यवसायांना अनुदान देणार आहे, जे जास्तीत जास्त लोकांना रोजगार देतील. हे अनुदान देण्याबरोबरच, सरकार खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना ₹१५,००० देईल. यामुळे देशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, अशी सरकारला अपेक्षा आहे.

ही योजना प्रामुख्याने सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग, उत्पादन, सेवा आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करेल. खासगी क्षेत्रातील पहिली नोकरी सुरू करणाऱ्या तरुण-तरुणींना या योजनेचा लाभ मिळेल. ईपीएफओमध्ये (EPFO) नोंदणी केल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेअंतर्गत तरुणांना दोन हप्त्यांमध्ये, प्रत्येकी ₹७,५०० मिळतील.

ज्या तरुणांचा पगार ₹१ लाख पेक्षा कमी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. ₹१ लाख पेक्षा जास्त पगार असणारे तरुण या योजनेसाठी पात्र नसतील. सहा महिने नोकरी पूर्ण झाल्यावर पहिला हप्ता (₹७,५००) आणि १२ महिने पूर्ण झाल्यावर आणि ‘फायनान्शियल लिटरेसी प्रोग्राम’ (आर्थिक साक्षरता कार्यक्रम) पूर्ण केल्यावर दुसरा हप्ता (₹७,५००) मिळेल.

या योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “या योजनेमुळे तरुणांसाठी नोकरीच्या नवनवीन संधी निर्माण होतील. आपण शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत, महिलांसाठी ‘लखपती दीदी’सारखी योजना सुरू केली आहे. आज लाखो शेतकरी आणि महिला या योजनांचा लाभ घेत आहेत. त्याचप्रमाणे, आता आपल्या सरकारने तरुणांसाठी ही नवीन योजना आणली आहे.”