Major Decision by MPSC

MPSC चा मोठा निर्णय! एका प्रयत्नात अपयश आल्यास पुन्हा परीक्षा देण्याची गरज नाही

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरदृष्टीचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) ‘प्रतिभा सेतू’च्या धर्तीवर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी (MPSC) ‘निपुण सेतू’ योजना सुरू करण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे. या योजनेमुळे परीक्षार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार असून संपूर्ण भरती प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि सुसूत्र होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी एमपीएससीमार्फत केवळ ५३ संवर्गांसाठी परीक्षा घेतली जात होती. मात्र, नव्या निर्णयानुसार ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढवून १०३ संवर्गांपर्यंत नेण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक पदांसाठी एकाच परीक्षेतून संधी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, एखाद्या उमेदवाराची एका विभागात निवड न झाल्यास किंवा इतर विभागात समकक्ष पद रिक्त असल्यास, त्याला पुन्हा परीक्षा द्यावी लागणार नाही. प्रतीक्षा यादीतील गुणवत्ताधारक उमेदवारांना थेट संधी देण्यात येणार आहे.

या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे एमपीएससीच्या गुणांच्या आधारे आता खाजगी क्षेत्रालाही गुणवंत उमेदवारांची निवड करता येणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची संधी हुकली तरी कॉर्पोरेट क्षेत्रात नवीन दरवाजे उघडणार आहेत. या निर्णयामुळे केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर उद्योग क्षेत्रालाही प्रशिक्षित आणि गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ सहज उपलब्ध होणार आहे.

हे पण वाचा » महिला व बाल विकास विभागात तब्बल 8,669 पदे भरणार; मंत्री अदिती ताटकरेंची माहिती

राज्य शासनाच्या या पावलामुळे प्रशासनातील रिक्त पदे भरून काढण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होईल, तसेच भरती व्यवस्थेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या निर्णयाचे स्वागत करत स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे म्हणाले, “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती होणाऱ्या संवर्गांची संख्या वाढवण्याचा हा खरोखरच क्रांतिकारी निर्णय आहे. यापूर्वी केवळ ५३ संवर्गांची भरती होत होती. आता सरकारने ती मोठ्या प्रमाणात वाढवून १५३ संवर्गांपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. गट ‘क’ सरळसेवा संवर्गातील सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घ्याव्यात, यासाठी आम्ही अनेक वर्षे पाठपुरावा करत होतो. आज त्याला यश मिळताना दिसत आहे, याचा मनापासून आनंद आहे.”

Scroll to Top