Indian Postal Department GDS Recruitment 2026: भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक अर्थात GDS पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत ब्रांच पोस्टमास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नसून उमेदवारांची निवड १०वीच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.
ऑनलाइन अर्जाची महत्त्वाची तारीख
या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया ३१ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार असून, उमेदवारांना १९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज भरताना काही चूक झाल्यास उमेदवारांना दुरुस्तीची संधीदेखील देण्यात आली आहे. अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी २३ सप्टेंबर २०२६ ते २४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत असेल.
कोणत्या पदांसाठी भरती होणार?
भारतीय डाक विभागाच्या ग्रामीण डाक सेवक भरतीअंतर्गत ब्रांच पोस्टमास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
ब्रांच पोस्टमास्टर पदासाठी वेतनश्रेणी १२,००० रुपये ते २९,३८० रुपये इतकी आहे. तर असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डाक सेवक पदासाठी १०,००० रुपये ते २४,४७० रुपये इतकी वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता काय आहे?
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराने १०वीमध्ये गणित आणि इंग्रजी हे विषय उत्तीर्ण केलेले असणे बंधनकारक आहे.
तसेच संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वीपर्यंत मराठी भाषा शिकलेली असणे आवश्यक आहे.
उमेदवाराला संगणकाचे मूलभूत ज्ञान तसेच सायकल चालवता येणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा किती आहे?
या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची, तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादेची सूट उपलब्ध आहे.
अर्ज शुल्क किती आहे?
या भरतीसाठी अर्ज शुल्क १०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. मात्र महिला उमेदवार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग उमेदवार आणि ट्रान्सवुमन उमेदवारांना अर्ज शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.
अर्ज करताना उमेदवारांना सर्व कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. मात्र अलीकडील छायाचित्र आणि स्वाक्षरी निर्धारित आकारानुसार अपलोड करणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया कशी होणार?
भारतीय डाक विभागाच्या GDS भरतीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड १०वीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे संगणकीय पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या गुणवत्ता यादीद्वारे केली जाईल.
गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर संबंधित उमेदवारांची कागदपत्रे पडताळली जातील. यावेळी उमेदवारांनी आवश्यक असलेली मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या दोन प्रती सोबत ठेवणे आवश्यक आहे.
काही महत्त्वाच्या सूचना
ग्रामीण डाक सेवक हे डाक विभागातील नियमित केंद्रीय कर्मचारी नसतात. त्यामुळे त्यांना नियमित केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व भत्ते आणि सेवा सुविधा लागू होत नाहीत.
GDS कर्मचाऱ्यांना दररोज किमान ४ तास ते कमाल ५ तास काम करावे लागते. तसेच उमेदवाराकडे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उपजीविकेसाठी भत्त्याव्यतिरिक्त उत्पन्नाचे दुसरे साधन असणे आवश्यक आहे.
ब्रांच पोस्टमास्टर पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला पोस्ट ऑफिसच्या कामकाजासाठी आवश्यक जागेची स्वतःच्या खर्चाने व्यवस्था करावी लागू शकते. तसेच संबंधित ठिकाणी वास्तव्यास असण्याची अट लागू असू शकते.
अर्ज कसा कराल?
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी भारतीय डाक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचून पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि इतर अटी तपासणे महत्त्वाचे आहे.
पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत ऑनलाइन अर्ज पूर्ण करावा. १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी परीक्षा न देता सरकारी क्षेत्रात काम करण्याची ही एक महत्त्वाची संधी ठरू शकते.
PDF जाहिरात: https://drive.google.com/
ऑनलाईन अर्ज लिंक: https://indiapost.gov.in/gdsonlineengagement